दिवाळीसाठी विमानाने प्रवास करताना ऐनवेळी नियमित भाड्यापेक्षा चौपट ते सहापट भाडे मोजावे लागू शकते. ऐन दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विमान कंपन्यांकडून भाडेवाढ केली जाते. आठ ते दहा दिवसांपूर्वी नियमित असणारे भाडे ऑनलाइन सर्च करताना चार ते सहापट वाढलेले दिसते. सरळ विमानसेवा नसल्यास कनेक्टेड सेवेच्या माध्यमातून तिकीट काढले तर यापेक्षाही मोठी किंमत मोजावी लागू शकते.
advertisement
Central Railway: दिवाळीआधी रेल्वेचा खोळंबा, शनिवारी पुणे – मुंबई वाहतूक ठप्प, 19 तासांचा मेगाब्लॉक!
छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावरून जाणाऱ्या विविध विमानांच्या भाड्यात मोठी वाढ दिसत आहे. विमानात अत्यल्प जागा शिल्लक असल्यास ऐनवेळी 'डायनामिक फेअर'मध्ये एकाच वेळी अनेक प्रवासी तिकिटाचा शोध घेत असतील तर अचानक मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ झाल्याचे दिसते.
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर बेसिक दरात वाढ केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील लोक हसत-हसत म्हणतात, “विमान प्रवास सोडा खूप महागला आहे, या भाड्यांत तर तुम्ही मुंबई किंवा बेंगळुरूला जाण्यापेक्षा थेट बँकॉकला जाऊन येऊ शकता!” विमान तिकिटांच्या या दरवाढीनंतर सामान्य प्रवाशासाठी दिवाळीतला प्रवास आर्थिक गणितं बिघडवणारा ठरत आहे.
विमान प्रवासाचे दर
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान तिकीटांचे दर प्रचंड वाढले आहेत. 4-5 हजारात मिळणारे विमान तिकीट आता 15 ते 20 हजारांच्या घरात पोहोचले आहे. विमान कंपन्यांच्या मते, दिवाळी हंगामात प्रवाशांची मागणी वाढल्याने सीट्स कमी पडत आहेत, त्यामुळे दर वाढविणे भाग पडले आहे.
संभाजीनगरहून विमान प्रवासाचे दर
मुंबई पूर्वीचे दर 4,500 नवीन दर 20,000
पुणे पूर्वीचे दर 3,200 नवीन दर 12,000
नागपूर पूर्वीचे तर 3,800 नवीन दर 13,500
दिल्लीपूर्वीचे दर 5,200 नवीन दर 28,000
विमान प्रवासा महागलाय त्यासोबतच खासगी ट्रॅव्हल्सचे दरही आकाशाला भिडले आहेत. या काळात प्रवासी मोठ्या संख्येने ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सने दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. मागणी वाढल्याने एकाच मार्गासाठी आता दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
खासगी ट्रॅव्हल्सचे दर काय?
छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी 1,200 रुपये नियमित भाडे होते. आता दिवाळीमध्ये हे भाडे 3,500 रुपये झाले आहे. म्हणजेच 2300 रुपयांची भाडेवाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरहून पुण्यासाठी 900 रुपये तिकीट होते. आता दिवाळीमुळे 2,200 रुपये भाडे आहे. 1300 रुपयांनी भाडेवाढ झाली आहे.
नागपूरसाठी 1,800 रुपये एवढे तिकीट होते. आता हे तिकीट 3,800 असणारा आहे. 2000 रुपयांनीही भाडे वाढ झाली आहे.
रेल्वे प्रवासही महागला
रेल्वे प्रवासही आता स्वस्त राहिला नाही. बहुतांश गाड्यांमध्ये वेटिंग सुरू आहे, तर डायनॅमिक प्राइसिंगमुळे दरही वाढले आहेत. तिकिट मिळवण्यासाठी प्रवाशांना आता ‘तत्काळ’चा पर्याय निवडावा लागतो, पण तेही फारसे सहज उपलब्ध नाही.
रेल्वे भाडे-स्लीपर क्लास ते प्रथमवर्ग वातानुकूलित
मुंबई : 245 ते 1615 रुपये
हैदराबाद: 320 ते 2010 रुपये
नवी दिल्ली : 643 ते 4020 रुपये
18 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही दरवाढ 3 नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. विमान कंपन्या, बस ऑपरेटर आणि रेल्वे प्रशासन सर्वांनी प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करण्याचा सल्ला दिला आहे.