पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना भागवतचा प्रियकर मूळचा अफगाणिस्तानचा आहे आणि तो गेली सात वर्षे भारतात वास्तव्यास आहे. त्याने ड्राय फ्रूट व्यवसायाच्या निमित्ताने देशात राहण्याचा परवाना मिळवला आहे. सध्या तो दिल्ली येथे राहतो. या दोघांची ओळख एसएफएस शाळेच्या मैदानात झाली होती. तेव्हा कल्पनाने स्वतःची ओळख 'लॉबिस्ट' आणि 'लायजनिंग'चे काम करणारी म्हणून दिली होती.
advertisement
सहा महिन्यांपासून हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या राहणाऱ्या कल्पनाला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. मंगळवारी, केंद्रीय आणि राज्य गुप्तवार्ता विभागाने तब्बल तीन तास तिची कसून चौकशी केली. तिने अजूनही आपण 'लायजनिंग'चे काम करत असल्याचे आणि त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे कबूल केले आहे. तिची पोलिस कोठडी बुधवारी (आज) संपत असून, तिला वाढीव कोठडीसाठी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.
कल्पनाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार केला. त्यात तिच्या खात्यातून सुमारे 32 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. यातील तिचे एक खाते कधी आणि का बंद झाले, याचा तपास पोलिस करत आहेत. कल्पना ही वारंवार विमानाने दिल्लीला आपल्या प्रियकराला भेटायला जात असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली व्यतिरिक्त, ती उदयपूर आणि जयपूर येथेही नियमितपणे प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
अटक होऊनही कल्पनाचे कुटुंबीय तिच्यापासून दूर राहात असल्याचे दिसून आले आहे. तिचा एक भाऊ पोलिस ठाण्यापासून जवळच हडको परिसरात राहतो, तसेच तिची आई अजूनही हॉटेलमध्ये आहे. मात्र, या दोघांनीही पोलिस ठाण्यात एकदाही भेट दिली नाही किंवा चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तिच्या हडको येथील भावाला बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे.






