हसूल येथील रमाईनगर भागात आई-वडील व भावासह राहणारा अनिकेत राऊत हा खासगी रुग्णालयात नोकरी करत होता. 2 जानेवारी रोजी सकाळी सुमारे आठ वाजता अनिकेतच्या वडिलांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांच्या मुलाला गंभीर जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ही बातमी समजताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच हसूल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनीही रुग्णालयात भेट देऊन तपास सुरू केला.
advertisement
लेकीचं भयानक कांड, आई थेट पोलिसांत, श्रुतीनं इसराईल सोबत..., सोलापुरातील घटनेनं खळबळ
अनिकेतने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, 2 जानेवारी रोजी हसूलच्या राधास्वामी कॉलनी परिसरातून चार जणांनी त्याला बुलेट दुचाकीवर बसवून भीमटेकडीकडे नेले. तेथे नेल्यानंतर चाकू आणि लोखंडी रॉडने त्याला जबर मारहाण करण्यात आली. पाठीत शस्त्राने वार करण्यात आले, तसेच त्याचा मोबाइल फोन हिसकावून घेण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मकाई गेट परिसरात फेकून देण्यात आले.
पोलिसांनी 3 जानेवारी रोजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पहाडसिंगपूरा येथील एका कॅमेऱ्यात दुचाकीवरून अनिकेतला मकाई गेटच्या दिशेने नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. संबंधित बुलेट दुचाकीच्या नंबर प्लेटवर ‘रावण’ असे लिहिलेले असल्याचे फुटेजमध्ये आढळले.
सुरुवातीला प्रचंड दहशतीखाली असलेल्या अनिकेतने 4 जानेवारी रोजी हिंमत एकवटून संपूर्ण प्रकार उघड केला. भीमटेकडी परिसरात नेल्यानंतर एका टकल्या व्यक्तीने आपल्यावर मारहाण केल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या ओळखीतील एका महिलेला त्रास देतो, असा आरोप करत चाकूने वार करण्यात आल्याचेही त्याने स्पष्ट केले. या प्रकरणातील एक संशयित संकेत याचा फोटो इन्स्टाग्रामवरून अनिकेतच्या वडिलांना दाखवण्यात आला होता.
अनिकेतचा 7 जानेवारी रोजी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर वडिलांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात संकेत मोतीलाल गायकवाड (24), विकास शेषराव वाघमारे (21) आणि आदित्य राजू आव्हाड (18, सर्व रा. एकतानगर) हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तिघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.






