छत्रपती संभाजीनगर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी नगर शहराचं एक खास कनेक्शन आहे. मराठवाड्याची राजधानी मानलं जाणाऱ्या या शहरात बाबासाहेबांनी काही काळ वास्तव्य देखील केलं. या शहरातील अनेक वस्तू आणि वास्तू आजही बाबासाहेबांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. येत्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं जातं. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीलाल राठोड यांनी माहिती दिलीये.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजीनगर शहराचा अगदी जवळचा संबंध आहे. बाबासाहेबांनी या शहरात अनेक दिवस वास्तव्य देखील केलंय. ते जेव्हा शहरामध्ये यायचे तेव्हा नागसेन वन आणि छावणी परिसरामध्ये वास्तव्यास होते. याच वास्तव्यात असताना त्यांना मराठवाड्यातील शिक्षणाच्या मागसलेपणाची जाणीव झाली. त्यासाठी त्यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शहरात महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मिलिंद महाविद्यालयाची स्थापना
बाबासाहेबांनी मराठवाड्यातील तरुणांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. विशेष म्हणजे सध्या ज्या जागेवर मिलिंद महाविद्यालय आहे ती जागा त्यांनी स्वत: विकत घेतली. या महाविद्यालयाचं बांधकाम सुरू झालं तेव्हा स्वतः बाबासाहेब काही दिवस या ठिकाणी होते. त्यांच्या देखरेखीमध्ये संपूर्ण महाविद्यालयाचे बांधकाम केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर झालेलं आहे, असंही डॉ. राठोड सांगतात.
बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह
बाबासाहेब छत्रपती संभाजीनगरमध्ये होते तेव्हाही त्यांचं वाचन सुरू होतं. त्यांनी वाचलेली सर्व पुस्तके आजही इथे आहेत. त्या सर्व पुस्तकांचा संग्रह मिलिंद महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयात एक छोटसं संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत. यामध्ये त्यांनी वापरलेले भांडी, नॅपकिन, खुर्ची, गादी हे सर्व साहित्य ठेवण्यात आलंय.
दरम्यान, बाबासाहेब यांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी घडले आहेत. बाबासाहेबांचा शैक्षणिक वारसा हे महाविद्यालय पुढे चालवत असल्याचेही प्राचर्य डॉ. राठेड सांगतात.