निखिल हिरामण सूर्यवंशी असं खून झालेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी होता. श्रावण ज्ञानेश्वर धनगर असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपी श्रावण याने कुऱ्हाडीने निखीलचं शीर धडावेगळं केलं. तसेच मृतदेहाची ओळख पटणार नाही, अशा अवस्थेत मृतदेह जंगलात फेकून दिला. पण दातांमध्ये लावलेल्या क्लिप्समुळे मृताची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रावणला अटक केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गौताळा अभयारण्यालगत असलेल्या 'सनसेट पॉइंट' जवळच्या जंगलात बुधवारी (३ सप्टेंबर) एका तरुणाचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. त्यानंतर २४ तासांत त्याचे शिरही मिळाले. मृतदेह इतका विद्रूप होता की ओळख पटवणे अशक्य झाले होते. मात्र, पोलिसांनी मृताच्या जबड्यातील स्टील क्लिप जप्त केली आणि तपासाला एक नवे वळण मिळाले
या प्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांचे लक्ष निखिलचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर (रा. शिंदी) याच्याकडे गेले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ७ दिवस शिंदी गावात राहून सखोल चौकशी केली. श्रवणने चौकशीदरम्यान सांगितले की, निखिल गुंडगिरी, चोरी आणि दारूच्या व्यसनामुळे बदनाम झाला होता. 'तुझ्यामुळे माझं लग्न जमत नाही' असे तो कायम मला म्हणत होता. २६ ऑगस्ट रोजी त्याने मला सहलीच्या निमित्ताने गौताळ्यात नेले. तेथेच त्याने माझ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी प्रतिकार करत त्याच्यावरच कुऱ्हाडीने वार केला आणि त्याचे शिर धडापासून वेगळे केले. पोलिसांनी श्रावणला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.