वटसावित्री पौर्णिमा म्हणजे सुवासिनींचा सण. या दिवशी सुवासिनी या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या मारतात आणि देवाकडे हाच पती सात जन्म भेटावा यासाठी प्रार्थना करतात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पत्नीपीडित संघटना आहे. या पत्नीपीडित संघटनने दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.
advertisement
पिंपळपौर्णिमा ते याकरता साजरी करतात की आम्हाला सात जन्म काय, एक जन्म काय, एक क्षण देखील ही पत्नी नको आहे, त्यासाठी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी पत्नीपीडित संघटनेतील सर्व पीडित पती हे पिंपळाचे पूजा करतात, पिंपळाला उलट्या फेऱ्या मारतात. यम देवाकडे प्रार्थना करतात की, पत्नी आम्हाला नको आहे. ही पत्नी उद्या देवाकडे प्रार्थना करेल, आम्हाला सात जन्म हाच पती हवा आणि त्यासाठीच आम्ही आधीच सांगून ठेवतो की, आम्हाला या पत्नीचा जन्म नको आहे.
आमच्या पत्नीपीडित संघटनेमध्ये सर्व पीडित पती आहेत, त्यांना त्यांच्या पत्नीने खूप त्रास, मानसिक त्रास दिलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की, पुरुषांसाठी देखील कायदे हे शासनाने करावे, फक्त महिलांसाठीच कायदे नको आहेत आणि आम्हाला आमचा हक्क मिळवून द्यावेत याकरिता आम्ही ही पत्नीपीडित संघटनेची स्थापना केली आहे आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी करतो, असं अध्यक्ष ॲडव्होकेट भरत फुलारे यांनी सांगितले आहे.