गणेश कॉलनीतील ही घटना रात्री सुमारे 10 वाजता घडली. घराबाहेर जाण्याची घाई असताना संबंधित मुलगी स्कार्फ बांधत होती. दोन्ही हात मोकळे राहावेत म्हणून तिने पिन ओठात धरली होती. अचानक घेतलेल्या श्वासासोबत पिन आत गेली. काही क्षणांतच तिला तीव्र खोकला, असह्य वेदना आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी तत्काळ तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले.
advertisement
कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. ज्या अरुंद श्वासनलिकेतून रुग्णाला भूल दिली जात होती, त्याच मार्गातून दुर्बीण आणि विशेष चिमट्याच्या सहाय्याने पिन पकडून बाहेर काढणे आवश्यक होते. दरम्यान पिन फुफ्फुसात रुतू लागली होती. जर ती दुर्बिणीद्वारे काढण्यात अपयश आले असते, तर फुफ्फुसाचा एक संपूर्ण भाग काढून टाकण्याची (लोबेक्टमी) वेळ आली असती. मात्र डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरी आणि कौशल्य दाखवत अवघ्या 6 ते 7 मिनिटांत पिन यशस्वीपणे बाहेर काढली.
पुणेकरांसाठी खुशखबर! नवा मेट्रो मार्ग लवकरच सेवेत दाखल होणार, अखेर डेडलाईन ठरली
डॉ. सुनील देशमुख यांनी माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या 8 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. स्कार्फ किंवा ओढणी लावताना पिन तोंडात धरण्याची सवय अनेक मुलींमध्ये दिसून येते, परंतु ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशी कृती टाळावी, असा त्यांनी सल्ला दिला.
या शस्त्रक्रियेत डॉ. सुनील देशमुख यांच्यासह डॉ. गिरिजा जालनापूरकर, डॉ. कल्याणी, डॉ. उत्कर्ष, डॉ. ऋषिकेश, डॉ. ऋतुजा आणि डॉ. तुषार यांनी सहभाग घेतला. भूलतज्ज्ञ डॉ. गणेश निकम आणि डॉ. किरण यांनी भूल व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. डॉक्टरांच्या वेगवान आणि समन्वयित प्रयत्नांमुळे एका क्षणाच्या चुकीतून निर्माण झालेला जीवघेणा प्रसंग सुखरूप टळला.






