दिनेश सुरेश चौडीये असं मृत पावलेल्या ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो संजयनगर भागात वास्तव्याला होता. शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास तो आपल्या मित्राने बांधलेल्या नवीन घराची पाहणी करायला गेला होता. पण घराची पाहणी करताना चौथ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश चौडीये हे चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी आपले दुकान बंद ठेवले होते. महेशनगर भागातील विद्यानिकेतन कॉलनीत त्याच्या मित्राचे नवीन घर बांधायचं काम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी ते तिथे गेले होते.
advertisement
घराचे काम पाहताना चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन ते खाली पडले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईक आणि मित्रांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.
या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, अपघातापूर्वी दिनेशने चौथ्या मजल्यावर आपला एक फोटो काढला होता, हा फोटो त्याच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला. जिन्सी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.