मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणारा बॅनर भाजपच्या फ्रेमवर लावल्यामुळे हा वाद पेटला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात जोरदार वाद झाला. वादातून हातघाई झाली आणि अखेर परिस्थिती राड्यापर्यंत पोहोचली.या हाणामारीमध्ये भाजपचे मोहन कोणकर, शिंदे गटाचा मुकेश कोट आणि आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले. तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या आधीच ही घटना घडल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते युतीला कसे साद देतील, याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी महेश गायकवाड यांच्या पोलीस ठाण्यात राडा झाला होता. हिललाईन पोलीस ठाण्यात माजी नगरेसवक महेश गायकवाड यांच्यावर दोन वर्षापूर्वी गोळीबार केल्याचा आरोप आहे. गणपत गायकवाड हे तळोजा कारागृहात आहेत. या दोघांमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत होते. या गोळीबाराच्या घटनेनंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर वितुष्ट निर्माण झाले होते.