राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सर्व मंत्र्यांची चांगलीच ‘शाळा’ घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर सगळे अधिकारी बैठकीतून बाहेर पडले. मात्र, मंत्र्यांची बैठक सुरू राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 20 मिनिटे चाललेल्या या अंतर्गत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधानं आणि गैरप्रकारांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. आता या पुढे असेच प्रकार पुढे सुरू राहिले तर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मु्ख्यमंत्री फडणवीस दिला.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी म्हटले की “ आता ही शेवटची संधी आहे. सरकारच्या कामकाजाला गालबोट लागणार नाही, असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच. पण आता एकही प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वादग्रस्त राहिलात तर दरवेळेस वाचणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. याआधीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तवणुकीवरून समज दिली. मात्र अलीकडील काही घटनांमुळे त्यांनी आता अधिक कठोर भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुती सरकार अडचणीत...
मागील काही दिवसांत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार यांचे मंत्री, आमदार हे मागील काही दिवसांत चांगलेच चर्चेत आले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिन चालकाला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर, शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम हे देखील डान्स बारच्या मुद्यावरून अडचणीत आले आहेत.
