मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काही निर्णयाचा फेरआढावा घेतला आहे. काही निर्णयांवर चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता मागील सरकारच्या काळात तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागाच्या अखत्यारीत रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी सफाईचे कंत्राट दिले होते. 3190 कोटींचे हे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात अडकले.
काय होते कंत्राट?
advertisement
सर्व शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे यांच्या साफसफाईचे हे कंत्राट होते. यासाठी प्रतिवर्षी 638 कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षासाठी 3190 कोटी रुपयांचे कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला दिले होते. मात्र, आर्थिक तरतूद नसतानादेखील या कामाची निविदा काढण्यात आली आणि मंजुरीदेखील दिली. आता याच निविदेवरून तानाजी सावंत अडचणीत येणार असल्याची चर्चा रंगली होती.
मुख्यमंत्री कार्यालयाने काय म्हटले?
मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, अशा प्रकारचा कोणतीही फाईल आमच्याकडे आली नाही. मुख्यमंत्री कार्यालयासमोर एखादी फाईल आल्यानंतर त्यावर निर्णय होईल असे या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान हे कंत्राटही अद्याप रद्द झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काय म्हटले?
मुख्यमंत्री कार्यालयाकडून कंत्राट रद्द करण्याबाबतचे वृत्त फेटाळले जात असताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले की, साफसफाई कंत्राट रद्द करण्यामागे पक्षीय कारण नाही. फक्त आरोग्य विभागच नाही तर प्रत्येक सरकारी विभागाने नियमानुसार काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पाच वर्षांत 3190 कोटी रुपयांचे कंत्राट अशा पद्धतीने देणे शक्य नव्हते. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला.