बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. 10 पैकी 6 एक्झिट पोलमध्ये महायुती सत्तेवर येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, 4 एक्झिट पोलमध्ये मविआला बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकार स्थापनेची सूत्रे ही लहान घटक पक्ष आणि अपक्षांच्या हाती असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
advertisement
मविआतील ज्येष्ठ नेत्यांची चर्चा
राज्यातील विधानसभा निवडणूक मध्ये झालेल्या मतदानानंतर महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. या नेत्यांनी राज्यातील मतदानाच्या वाढीव आकडेवारी चर्चा झाली. त्याशिवाय, मतदानाचे पॅटर्न, एक्झिट पोलवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसच्या संकटमोचकाची एन्ट्री
राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालीत काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार यांची एन्ट्री झाली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री असलेले डीके शिवकुमार यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदारांशी संपर्क साधणे, त्यांना एकत्र ठेवण्यापासून सत्ता स्थापनेपर्यंत डीके शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. निकालानंतर अपक्षांचे वाढते महत्त्व लक्षात घेता, त्यांच्यासोबत डीके शिवकुमार चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, सतेज पाटील यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपही अॅक्शन मोडवर
यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. काही एक्झिट पोलनुसार, राज्यात त्रिशंकू परिस्थिती राहण्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात लहान घटक पक्ष आणि बंडखोरांचे महत्त्व वाढणार आहे. त्याआधीच त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. एक्झिट पोलनंतर भाजपकडून विजयाची क्षमता असलेल्या अपक्ष आमदारांसोबत संपर्काची रणनीति आखण्यास सुरुवात केली.
