आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीमध्ये राजकीय वारे वाहू लागले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश सोहळे सुरू आहे. मात्र, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पेटला आहे. अलीकडेच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत मा. नगरसेवक नंदु म्हात्रे (काँग्रेस आय.), मा. नगरसेवक हृदयनाथ भोईर (काँग्रेस आय.), मा. नगरसेवक जितेंद्र भोईर (काँग्रेस आय.) आणि मा. नगरसेवक हर्षदा भोईर (काँग्रेस आय.) यांनी प्रवेश केला होता. अनेक माजी नगरसेवक सोडून गेल्यामुळे काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी माजी आमदार संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
advertisement
संतोष केणे यांनी नाव न घेता संजय दत्त यांच्यावर आरोप करत सांगितलं की, 'कल्याणची परिस्थिती एका डायनासोरने गंभीर करून ठेवली आहे. तो डायनासोर दिल्लीत जाऊन बसला आहे. त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिलं नाही. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य होण्यासाठी लागणारे आठ सदस्य यांच्यासाठीच केवळ त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत या व्यतिरिक्त पक्षासाठी त्यांनी काही केलेलं नाही' अशी टीका केणे यांनी केली.
'तीन वेळा त्यांना विधानपरिषद दिली, तरी सुद्धा त्यांनी पक्ष संघटना बांधली नाही. कल्याणच्या पक्ष कार्यालयासाठी जो निधी दिला तो सुद्धा त्यांनीच खाऊन टाकला, असा गंभीर आरोपही महाराष्ट्र प्रदेशचे सचिव संतोष केणे यांनी केला.
दरम्यान, संतोष केणे हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. केणे सुद्धा पक्ष सोडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.