मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा सुरू आहे. काही योजनांच्या निधीवर कात्री लागल्याची चर्चा सुरू आहे. आता ऐन दिवाळीत राज्यातील गरिबांच्या चेहऱ्यांवरील आनंद हिरावला जाणार आहे. महायुती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली आणखी योजना आता अखेरच्या घटका मोजत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
advertisement
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने मोठ्या दिमाखात सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना गुंडाळली जाणार असल्याची चिन्हे आहेत. आर्थिक चणचणीमुळे तीन वर्षांपासून ही योजना प्रत्यक्षात राबवता आलेली नाही आणि यंदाच्या दिवाळीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही योजना कायमचीच बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये ‘लाडकी बहीण योजना’, ‘शेतकऱ्यांना मोफत वीज योजना’, ‘ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना’ आणि ‘आनंदाचा शिधा’ या योजना विशेष गाजल्या. परंतु प्रत्यक्षात निधीअभावी बहुतांश योजना अंमलबजावणीअभावी थांबल्या आहेत.
‘लाडकी बहीण’ आणि ‘मोफत वीज’ यांसारख्या काही योजना सध्या सुरु असल्या, तरी उर्वरित योजनांना निधी न दिल्याने त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने निधी वितरित न केल्याने योजनांचा गाडा रुळावर येऊ शकलेला नाही.
‘आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात गरीबांना फक्त 100 रुपयांत पामतेल, रवा, चणाडाळ आणि साखर उपलब्ध करून दिली जात होती. या योजनेमुळे हजारो कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळत होता.