धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता सिमोल्लंघणानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मंचकी निद्रा घेते यालाच श्रमनिद्रा असे म्हटले जाते. विजयादशमी दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी कोजागिरी पौर्णिमे दरम्यान गेल्या 25 वर्षांपासून उमरगा शहरात सुरू अन्नछत्र आहे.
advertisement
पायी चालत येणाऱ्या या भाविकांच्या सोयीसाठी स्वामी विवेकानंद नवरात्र महोत्सव मंडळाकडून उमरगा शहरात 1998 मध्ये अन्नछत्र चालू करण्यात आले. सुरुवातीला शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान हे अन्नछत्र चालू असायचे. त्यानंतर 2011 नंतर श्रीशैल व्हंडरे यांनी पुढाकार घेऊन हे अन्नछत्र विजया दशमी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत चालवले जाते.
आई राजा उदो उदो! चिमुकली पाऊले भक्तीच्या वाटेवर, कोजागिरीसाठी तुळजापूरच्या मार्गावर गर्दी
दरम्यान अन्नछत्रामध्ये दररोज जेवणाचे पदार्थ बदलले जातात. कधी वरण-भात कधी पुरी भाजी तर कधी झुणका भाकरी अशी जेवणाची व्यवस्था केली जाते. 24 तास भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येते.
खरंतर शालेय नवरात्र महोत्सव दरम्यान आणि विशेष म्हणजे विजयादशमी दसऱ्यानंतर ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दक्षिण भारतातून मोठ्या संख्येने तुळजापुरात भाविक पायी चालत येतात. या चालत येणाऱ्या भाविकांसाठी वाटेत शेकडो अन्नछत्र स्वयंस्फूर्तीने भाविकांच्या सोयीसाठी चालवले जातात. त्यामुळे खरंतर अन्न हे पूर्णब्रह्म आहे याचीच इथं प्रचिती येते.