आई राजा उदो उदो! चिमुकली पाऊले भक्तीच्या वाटेवर, कोजागिरीसाठी तुळजापूरच्या मार्गावर गर्दी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
कोजागरी पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भाविक सोलापूर ते तुळजापूर 45 किलोमीटर प्रवास पायी करतात.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : नुकताच नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात लाखो भक्तांनी देवीचं दर्शन घेतलं. पण तुळजापूरकडे जाणारा भक्तांचा लोंढा अजूनही कायम असून सोलापूर - तुळजापूर महामार्गावर 'आई राजा उदो उदो'चा गजर सुरू आहे. नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमेसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील भाविक तुळजापूरला पायी जातात. विशेष म्हणजे या भक्तीच्या वाटेवर अनेक चिमुकली पाऊलेही दिसत आहेत.
advertisement
साडेतीन शक्ती पिठापैकी एक शक्तीपीठ म्हणून तुळजाभवानी मंदिराची ओळख आहे. दसरा उत्सव झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात भाविकांचे जत्थे तुळजापूरला निघतात. सोलापूरसह कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, गदग तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणातील भाविकही तुळजापूरला येतात. कोजागिरीला तुळजापुरात लाखो भाविकांची मांदियाळी असते.
लाखो भाविकांची पायी वारी
कोजागरी पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भाविक सोलापूर ते तुळजापूर 45 किलोमीटर प्रवास पायी करतात. सोलापुरातील रूपाभवानी देवीचे दर्शन घेऊन भाविक तुळजापूरकडे मार्गस्थ होतात. तेव्हा तुळजापूर नाक्यावर 'आई राजा उदो उदो'चा जयघोष सुरू असतो.
advertisement
सोलापूर-तुळजापूर वाहतूक बंद
कोजागिरीमुळे सोलापुरातील रस्ते भक्तांच्या गदीर्ने फुलून गेले आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता तुळजापूरची वाट चालणाऱ्या भाविकांच्या 'आई राजा उदे उदे'च्या जयघोषाने सोलापूर दुमदुमून गेले आहे. सोलापूर- तुळजापूर रस्ता लाखो भाविकांच्या गदीर्ने फुलून गेला असून या मार्गावरील वाहतूक दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विविध संघटनांनी भाविकांसाठी अल्पोपहार, महाप्रसाद यांची सोय केली आहे.
advertisement
नवस पूर्ण झाल्यावर पायी वारी
"माझ्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. परंतु, पुत्रप्राप्ती होत नव्हती. मी आई तुळजाभवानीला नवस केला की मला मूलं होऊ दे. त्या मुलाला घेऊन पायी तुझ्या दर्शनाला येईन आणि आईने माझा नवस पूर्ण केला. म्हणून आज मी माझ्या मुलाला घेऊन तुळजापूरला जात आहे," असं सोलापुरातील भाविक दीपक चव्हाण सांगतात. तसेच माझ्या मुलाला सुख समृद्धी लाभो दे, हीच आई चरणी प्रार्थना करतो, असं मागणं मागतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 15, 2024 3:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आई राजा उदो उदो! चिमुकली पाऊले भक्तीच्या वाटेवर, कोजागिरीसाठी तुळजापूरच्या मार्गावर गर्दी