धाराशिव : आपल्या मुलांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांनी खूप शिकावं आणि मनासारखं आयुष्य जगावं यासाठी जवळपास सर्व आई-वडील आपापल्या परीनं जीवाचं रान करत असतात. अगदी दिव्यांग म्हणून बाळाचा जन्म झाला तरी आई-वडील त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपतात. अशात आपल्या 13 वर्षीय मुलाला ब्रेन डेड होताना पाहणं हे अत्यंत वेदनादायी आहे. ही वेदना सोसली धाराशिवच्या एका दाम्पत्यानं. परंतु यातून त्यांनी एक अत्यंत प्रेरणादायी असा निर्णय घेतला.
advertisement
माजी नगरसेविका सुनंदाबाई गुलाबराव वरवंटे या उमरगा शहरातील काळे प्लॉट इथं राहतात. त्यांचे सुपुत्र बाळासाहेब यांचा मुलगा 13 वर्षीय पृथ्वीराज सोमवारी सायकलवरून शाळेत गेला. तोपर्यंत सारंकाही ठीक होतं. मात्र शाळेत प्रार्थना सुरू असताना त्याला अचानक चक्कर आली.
चक्कर आल्यावर पृथ्वीराजला ताबडतोब उमरगाच्या खासगी रुग्णालयात नेलं. तिथं प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूरच्या मेंदूकार तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी पृथ्वीराजचा मेंदू मृत झाल्याचं सांगितलं. म्हणजेच तो ब्रेन डेड झालाय हे समजताच त्याचा आई-वडिलांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. त्यानंतर डॉक्टरांनी पृथ्वीराजच्या आई-वडिलांना अवयव दानाबाबत माहिती दिली.
हेही वाचा : 16 व्या मजल्याहून पडला 4 वर्षाचा मुलगा; जीव वाचवण्यासाठी धावत गेले लोक, पण दिसला मोठा 'चमत्कार'
आपला 13 वर्षीय मुलगा ब्रेन डेड झाल्याचं प्रचंड मोठं दुःख असतानाच त्याच्यामुळे इतर मुलांना जीवनदान मिळावं यासाठी पृथ्वीराजच्या आई-वडिलांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 10 ते 16 वयोगटातील 6 मुलांना त्यांनी पृथ्वीराजचे अवयव दान केले. आता या सहाही मुलांना जीवनदान मिळालं आहे. वरवंटे कुटुंबाचं हे कृत्य समाजासाठी खरोखर प्रेरणादायी ठरलंय.
ब्रेन डेड स्थिती म्हणजे नेमकं काय?
ब्रेन डेड ही अशी स्थिती आहे ज्यात मेंदू काम करणं थांबवतो. मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया होत नाही. तसंच मेंदू मृत झाल्यावर शरिराची हालचाल, श्वास आणि डोळ्यांच्या पापण्यांचा प्रतिसादही थांबतो. परंतु इतर सर्व अवयव जसं की, हृदय, यकृत, किडनी व्यवस्थित काम करतात. म्हणजे अशा स्थितीत केवळ शरीर जिवंत राहतं. मात्र शरिराला वेदना होत नाहीत.
ब्रेन स्टेम हा मध्य मेंदूचा मध्य भाग आहे. तिथून आपल्या सर्व अवयवांना संकेत मिळतात. म्हणजे बोलणं, डोळे मिचकावणं, चालणं, हावभाव बदलणं अशी सर्व कार्य इथून चालतात. त्यामुळे मेंदूचंच कार्य थांबल्यास शरिराला कितीही वेदना दिल्या तरी तो कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. ब्रेन डेड रुग्णाला श्वास घेता येत नसल्यानं व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. शक्यतो या स्थितीत पोहोचलेले रुग्ण फार काळ जगू शकत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात.