धाराशिव: सध्याच्या काळात मोबाईल आणि टीव्हीमुळं शाळकरी मुलांचं अभ्यास आणि मैदानी खेळांकडं दूर्लक्ष होत असल्याची अनेक पालकांची ओरड असते. परंतु, यावर नेमका उपाय अनेकांना समजत नाही. पण त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जकेकुरवाडी गावातील लोक एकत्र आले आणि त्यांनी एक उत्तम उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार गावात सायरन वाजतो आणि दोन तासांसाठी गावातील मोबाईल, टीव्ही पूर्णपणे बंद केले जातात. या गावाच्या अशाच अनोख्या उपक्रमांमुळे गावाची ओळख महाराष्ट्रातील आदर्श गाव अशी झाली आहे. याबाबत गावचे युवा सरपंच अमर सूर्यवंशी यांनी माहिती दिलीये.
advertisement
मुलांच्या अभ्यासासाठी अनोखा उपक्रम
गावातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा म्हणून जकेकुरवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. गावात सायंकाळी 7 ते रात्री 9 या काळात मोबाईल व घरातील टीव्ही बंद करण्याचा निर्णय झाला. आता संपूर्ण गाव यानिर्णयाचे पालन करत आहे. विशेष म्हणजे गावात 7 वाजता सायरन वाजतो आणि सर्व विद्यार्थी वह्या-पुस्तके घेऊन अभ्यासाला बसतात. या काळात गावात सायलेन्स झोन पाळला जातो. मुलांना अभ्यासात कोणताही व्यत्यय येऊ नये, हाच त्यामागचा हेतू आहे, असं सरपंच सांगतात.
सुंदर असा निसर्ग न्याहाळायचाय? तर मग इथं या, महाराष्ट्रातील पक्ष्याचं गाव माहितीये का?, VIDEO
मैदानी खेळांसाठी राखीव वेळ
जकेकुरवाडी गावात सायंकाळी 5 वाजता सायरन असतो आणि घरातील मुलं अंगणात खेळायला येतात. पाच ते सात या वेळात मुले खेळतात. त्यानंतर 7 वाजता पुन्हा एकदा सायरन वाजतो आणि मुलं अभ्यासाला बसतात. 7 ते 9 ही मुलांच्या अभ्यासाची वेळ असल्यानं या काळात कुणीही टीव्ही सुरू करत नाही. तसेच सायलन्स झोनही पाळला जातो. या नियमांचं उल्लंघन केल्यास ग्रामपंचायतीनं आर्थिक स्वरुपात दंडाची तरतुद केल्याचं सरपंच सूर्यवंशी सांगतात.
181 वर्षांची परंपरा, काय आहे अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाचा इतिहास, अनेकांना माहिती नसेल VIDEO
दारु पिणाऱ्याला नो एन्ट्री
गेल्या 4 वर्षात जेकेकुरवाडी हे राज्यातील आदर्श गाव म्हणून पुढं आलंय. गावात दारू पिणाऱ्याला प्रवेश नाही. दारू आणि गुटखा खाण्यास व विक्रीस बंदी आहे. त्यामुळे या गावाने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आमच्या गावात योजना फक्त कागदावर बनत नाहीत, तर त्या वास्तवात राबविल्या जातात, असेही सरपंच सूर्यवंशी सांगतात.
दरम्यान, या उपक्रमाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर दिसून आलाय. गावातील विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास दिसून आलाय. मुलांची गुणवत्ता सुधारली असून हा आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांनीही घ्यावा असा आहे.