धाराशिव : अगदी लहान वयात सायकल दुरुस्तीचे काम करून आणि पान टपरीवर काम करून शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. जन्मताच दिव्यांग असलेली ही व्यक्ती आज वर्षाला तब्बल 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. तानाजी घोडके असे या व्यक्तीचे नाव आहे.
कोण आहेत तानाजी घोडके -
advertisement
तानाजी घोडके हे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देऊळगाव या छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. जन्मताच दिव्यांग असलेल्या तानाजी यांना अगदी सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला. शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने सायकल दुरुस्तीचे त्यांनी काम केलं. त्याचबरोबर एका पान टपरीवर काम करून आलेल्या पैशातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाची ओढ मनात असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होता येतं, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.
जन्मताच तानाजी हे दिव्यांग आहे. त्यांचा जन्म 21 जून 1990 रोजी शेतमजूर कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आई-वडील लोकांच्या शेतात जाऊन काबाडकष्ट करायचे. त्यामुळे घरी शिक्षणासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत अगदी लहान वयातच तानाजी यांनी सायकल दुरुस्तीचं काम सुरू केलं. त्यानंतर देऊळगाव ते तांदूळवाडी हा तीन किलोमीटरचा पायी प्रवास करून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना होतोय फायदा, शासकीय दंत महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम आहे तरी काय?
माध्यमिक शिक्षणासाठी पैशांची कमी भासत असल्याने तानाजी यांनी पान टपरीवर काम करत अभ्यास केला आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत डीएड पूर्ण केले. त्यानंतर आयुष्यात काहीतरी करून दाखवावे, या जिद्दीने त्यांनी 2013 मध्ये संगणक व्यवसाय सुरू केला. सोबतच अबॅकस क्लासेसही सुरू केले. तानाजी घोडके हे अबॅकस क्लासेस आणि संगणक व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.
तानाजी घोडके यांचं कौतुकास्पद कार्य -
विशेष म्हणजे, मिळालेल्या पैशातून ते दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मदत करीत आहेत. दिव्यांगांमध्ये जनजागृती करणे, दिव्यांग बांधवांपर्यंत शासकीय योजना लाभ मिळवून देणे, दिव्यांग बांधवांना पुरस्कार वितरण करणे, दिव्यांगांमध्ये जनजागृती करण्याचं काम ते करीत आहेत. अबॅकस क्लासेस आणि संगणक व्यवसायातून त्यांची चांगली भरभराट झाली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी सोनाली घोडके यांची साथ मिळत आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.