धाराशिव : अखंड संत संस्कृतीचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र भूमीत आषाढी वारी म्हणजे एक आनंदाचा आणि श्री विठुरायाच्या भक्ती भावाचा एक भव्य दिव्य सोहळा आहे. श्री विठू माऊलीच्या दर्शनासाठी कोणी पायी जातात तर कोणी वाहनाने. महाराष्ट्रभरातून आणि देशभरातून लाखो वारकरी पंढरीत श्री विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात.
वारीमध्ये समतेचे दर्शन घडते. पांडुरंगाच्या भक्तीत वारकरी लीन झालेले पाहायला मिळतात. याच पांडुरंगाच्या भक्तीत लीन होत दिव्यांगांची दिंडीही निघाली आहे. यवतमाळ ते पंढरपूर संत्वसुर्दास महाराज दिव्यांग दिंडी निघाली आहे. यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट व दिव्यांग संघ यवतमाळ द्वारा या दिंडीचे आजोजन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या दिव्यांग वारीचे अध्यक्ष रविन कठाळे तर सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वनगिनवार असून संयोजक सदानंद तायडे हे आहेत.
advertisement
आषाढी एकादशीसाठी रेल्वे, एसटी महामंडळ सज्ज! काय आहे नियोजन?
अंध आणि दिव्यांग बांधवांची पालखी पहिल्यांदाच आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघाली आहे. जवळपास 400 किलोमीटरचं हे अंतर अंध आणि दिव्यांग वारकरी पायी चालत पूर्ण करीत आहेत. दिव्यांग बांधव दररोज जवळपास 35 किलोमीटर अंतर पायी चालत आहेत. या वारीत 13 अंध वारकरी व त्यांच्या मदतीसाठी 7 जण डोळस वारकरी पायी चालत आहेत. मजल दरमजल करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही सर्व मंडळी निघाली आहे.
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे, या उक्तीप्रमाणे अंध असूनही विठुमाऊली जाणून घेण्यासाठी आणि मनातली विठुमाऊली ओळखण्यासाठी ही सर्व मंडळी यवतमाळ ते पंढरपूर पायी प्रवास करत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.