धाराशिव : अनेक जणांना नोकरी करायला आवडते. तर काही जण नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करतात. काही जण वडिलांचा व्यवसाय पुढे नेतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जे आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजारात हॉटेलचा व्यवसाय तर इतर दिवशी बस स्टँडवर पेढा विक्री करुन महिन्याभरात लाख रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
मनोज काटकर असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला हॉटेलचा व्यवसाय आजही त्यांनी सुरू ठेवला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून मनोज काटकर हे महिन्याकाठी एक लाख रुपयांची उलाढाल करत आहे. हॉटेल व्यवसाय चालवताना मनोज काटकर यांनी अनोखी शक्कल लढवली. ते पन्नास रुपयात राईस प्लेट तर केवळ 7 रुपयात पाणी बॉटलची विक्री करतात. इतर ठिकाणी महागड्या वस्तू विकल्या जातात. मात्र, त्या तुलनेत याठिकाणी स्वस्त दरात राइस प्लेट आणि पाण्याची बॉटल मिळत असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी असते.
धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील आठवडी बाजारात मनोज काटकर हे दर सोमवारी हॉटेलचा व्यवसाय करतात. वालवडचा जनावरांचा आठवडी बाजार हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या बाजारात लोकांची मोठी गर्दी असते. त्या ठिकाणी मनोज काटकर हे पुरी भाजी राईस प्लेट विक्री करतात. त्यांच्या वडिलांनी 25 वर्षांपूर्वी आठवडी बाजारात हा व्यवसाय सुरू केला होता. त्यातून आता त्यांना दिवसाकाठी 15 हजार रुपयांची उलाढाल होते. तर यासोबतच ते उर्वरित दिवशी वालवड येथील बस स्टँडवर पेढा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातून दिवसाकाठी 1 ते दीड हजारांची उलाढाल होत आहे.
हॉटेल व्यवसाय आणि पेढा विक्रीतुन 1 लाख रुपयांची महिन्याकाठी उलाढाल होते. त्यांच्या या कामात त्यांना त्यांचे आई-वडील आणि पत्नी यांची मदत मिळते. यासोबतच ते आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून 2 कामगारांना रोजगारही देत आहेत. आठवडी बाजारात आठवड्यातून 1 दिवस हॉटेलचा व्यवसाय आणि इतर दिवशीही सतत मेहनतीने आपला व्यवसाय करणाऱ्या मनोज काटकर यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.