धाराशिव : महाराष्ट्रासह देशभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. सध्या पालख्या आणि शेकडो दिंड्यांसह वारकरी, भाविक 'विठ्ठल, विठ्ठल' नामस्मरण करत, टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या वाटेवरून पायी चालत आहे. पंढरपूरला आलेल्या लाखो वारकऱ्यांचं आता धाराशिवचा पेढा तोंड गोड करणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम इथून खव्याचे 10 टन पेढे पंढरपूरला पाठवण्यात येणार आहेत. विनोद जोगदंड यांच्या खवा क्लस्टरला 10 टन पेढ्यांची ऑर्डर मिळाली आहे. त्यासाठी आठवड्याभरापासून इथं पेढे बनवण्याचं काम जोमात सुरू आहे.
advertisement
हेही वाचा : आषाढी एकादशीसाठी रेल्वे, एसटी महामंडळ सज्ज! काय आहे नियोजन?
भूम तालुक्यातील कुंथलगिरी परिसरात मोठ्या प्रमाणात पेढा आणि खव्याच्या भट्ट्या आहेत. परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पेढा पंढरपूरला पाठवण्यात येणार आहे. या पेढ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सौर ऊर्जेवर बनवला जातो. शिवाय मशीनच्या सहाय्याने कमी मनुष्यबळ वापरून तयार केलेला हा पेढा असतो.
कुंथलगिरीच्या खव्याला नुकतंच जी आय मानांकन प्राप्त झालं. याच खव्याचा पेढा आता वारीचा गोडवा वाढवेल. पंढपूरहून भाविकांना घरी जाताना प्रसाद म्हणून हा पेढा दिला जाणार आहे, असं विनोद जोगदंड यांनी सांगितलं.