धाराशिव : लाखो भारतीयांच्या दिवसाची सुरूवात चहानं होते. त्यामुळे इथं चहाचा व्यवसाय नफ्याचा ठरतो. आपण पाहिलं तर, साध्या टपरीवरसुद्धा सकाळ-संध्याकाळ भरपूर गर्दी असते. धाराशिवमधले एक चहा विक्रेते तर एका भन्नाट कल्पनेनं चहा विकतात.
धाराशिवच्या तेर येथील महादेव नाना माळी हे 20 वर्षांपासून चहा विक्रीचा व्यवसाय करतात. तिसरी पास असलेले महादेव शेताच्या बांधावर जाऊन चहा विकतात. विशेष म्हणजे त्यासाठी आधी ऑर्डर घेतात. एकदा ऑर्डर मिळाली की, ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो ते कशाचीही परवा न करता चहा पोहोचवतात.
advertisement
हेही वाचा : उच्चशिक्षित तरुणानं शेती करायचं ठरवलं; पीक असं निवडलं की, निव्वळ नफाच होतो लाखांचा!
तेर हे धाराशिव तालुक्यातील 15 हजार लोकसंख्येचं गाव. इथं चहा बनवण्यासाठी महादेव यांना दिवसाकाठी 50 ते 60 लिटर दुधाची गरज भासते. या व्यवसायात त्यांना पत्नीसह आपल्या 2 मुलांचं सहकार्य मिळतं. ते तेर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये 2 ते 3 किलोमीटर अंतरावर चहा घेऊन जातात आणि केवळ 5 रुपयात 1 कप चहा विकतात.
महादेव माळी हे फोनवर ऑर्डर घेतात. जिथून ऑर्डर येईल तिथे ते चहा पोहोचवतात. दिवसाला दीड ते 2 हजार कप चहा विक्री होत असल्यानं महादेव माळी यांना चांगलं उत्पन्न मिळतं. दीड हजार कप चहा विक्री झाली तर दिवसाकाठी 7 हजार रुपयांच्या आसपास आणि 2 हजार कप चहाची विक्री झाली, तर दिवसाला तब्बल 10 हजार रुपये उत्पन्न मिळतं. त्यातून त्यांचं घर उत्तम सुरू आहे.