दरवर्षी बारामतीतील गोविंदबाग हे ठिकाण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाने न्हाऊन निघालेले असते. पाडव्याच्या दिवशी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पवार कुटुंबियांचे समर्थक मोठ्या संख्येने गोविंदबागेत दाखल होतात. या दिवशी कार्यकर्ते शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतात आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. गोविंद बागेतील हा दरवर्षीचा सोहळा महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रस्थानी असतो.
advertisement
मात्र यंदा पवार कुटुंबियांनी हा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतापराव पवार यांच्या पत्नींच्या निधनामुळे कुटुंबियांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी गोविंदबागेत नेहमीप्रमाणे होणारी गर्दी आणि उत्सवाचे वातावरण यंदा दिसणार नाही.
पवार कुटुंबियांचा दिवाळी सण नेहमीच पवार समर्थकांसाठी एक भावनिक आणि आपुलकीचा क्षण असतो. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधून कार्यकर्ते खास दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत येतात. मात्र, यंदा पवार कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना यंदा बारामतीत येता येणाक नाहीये.
पक्षफुटीवेळी दोन दिवाळी पाडवे
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम वेगळा झाला तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम गोविंदबागेत संपन्न झाला. मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य जातीने हजर असतात. पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्यभरातून सामान्य जनताही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावते. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची दोन शकले पडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकाऱ्यांना यंदाच्या गोविंदबागेतील पाडव्याला दांडी मारली होती.