नांदिवली परिसरामध्ये झालेल्या हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली पूर्वमधील नांदिवली परिसरामध्ये मिनी व्हॅन चालक आणि ड्रायव्हरमध्ये पगारामुळे चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. मिनी व्हॅन मालक हा रिक्षा यूनियनचा लीडर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चाकू हल्ल्यामध्ये ड्रायव्हर आणि चालक दोघेही जखमी झाले असून त्यांना परिसरातील एका खासगी रूग्णालयामध्ये दाखल केलं आहे. रूग्णालयाकडून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
advertisement
तीन महिन्यांचा पगार न दिल्यामुळे मिनी व्हॅन मालकाचे चालकासोबत वाद झाल्याचे म्हटले जात आहे. ड्रायव्हरने आधी मालकावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मालकानेही ड्रायव्हरवर चाकूने वार केला. पगाराच्या वादातून दोघांमध्ये झालेल्या झटापटीत दोघेही गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काय-काय घडलं ते पाहायला मिळते. घटनेनंतर मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नांदिवलीमध्ये भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.