डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी परिसरातल्या बेडेकरी गल्लीमध्ये रविवारी (28 सप्टेंबर) रात्री साडे दहाच्या सुमारास काही तरूणांनी एकावर हल्ला केला आहे. गरब्यामध्ये दांडिया खेळत असलेल्या एका तरूणावर चार जणांनी कोणतंही कारण नसताना अचानक चॉपर आणि लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यामध्ये त्या हल्लेखोरांनी तरूणाच्या पाठीवर चॉपरने हल्ला करत गंभीर जखमी केले. या प्रकरणात हल्ला झालेल्या तरूणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 19 वर्षीय तरूण मुळचा डोंबिवलीतील रहिवासी आहे. जो डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रूग्णालयामागे असलेल्या कोपर छेद रस्त्यावरील एका चाळीमध्ये राहतो.
advertisement
या तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दिपेश टेकाळे, भैय्या काऊतर, अभय खाडे आणि अन्य एक अशा चार जणांच्या विरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाने गुन्हा दाखल केला आहे. तो तरूण घरपोच वस्तू विक्री व्यवसायात एका खासगी कंपनीत वितरण कर्मचारी म्हणून काम करतो. हल्ला झालेल्या तरूणाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले की, मी माझ्या तीन मित्रांसोबत रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी मधील बेडेकर गल्लीतील गरबा कार्यक्रमात दांडिया खेळत होतो. दांडिया खेळत असताना बाजुच्या परिसरामध्ये मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. त्या परिसरातले लोकं भांडण करत होते, नेमकं कोणत्या कारणास्तव भांडण सुरू होतं आम्हाला माहित नाही.
ते लोकं भांडत असताना आम्ही गरबा खेळत असलेल्या ठिकाणी एकमेकांसोबत भांडत आले. तिथे ते चार तरूण एकमेकांना ढकलत होते. त्यांचे भांडणं चालू असताना मी गरबा खेळत होतो आणि माझे 3 मित्र रस्त्याच्या कडेला उभे राहून गरबा पाहत होते. कोणतंही कारण नसताना त्या चार तरूणांनी माझ्या मित्रांना मारहाण करायला सुरूवात केली. माझ्या मित्रांना कोणतरी मारतंय, हे पाहून मी दांडिया खेळण्याचे सोडून धावत रस्त्यावर धावत आलो आणि माझ्या मित्रांना मारहाण करणाऱ्या तरूणांच्या तावडीतून सोडवू लागलो. त्यावेळी त्या चौघे गुन्हेगारांनी माझ्यावर मी पाठमोरा उभा असताना पाठीवर चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मी गंभीर जखमी झालो. त्याच वेळी माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका मित्राच्या पाठ आणि पायावर या बाकीच्यांनी चॉपरने हल्ला करून त्यालाही जखमी केले.
हल्ला करणारे ते चौघे तरूण कोण होते ? ते मला माहित नाही, असं गंभीर जखमी असलेल्या तरूणाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये सांगितले. शिवाय, आपला मारहाण प्रकरणाशी काही संबंध नसताना मला आणि माझ्या मित्रांना त्या चार हल्लेखोरांनी विनाकारण मारहाण करून हल्ला केल्यामुळे त्या गंभीर जखमी असलेल्या तरूणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.