MHADA : आता लॉटरीतलं घर कधीही विकता येणार? MHADA मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Last Updated:
MHADA House Immediate Sale Rules : म्हाडाचे घर लगेच विकणे शक्य आहे का. मुंबईत म्हाडा घर घेणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत का ते जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबईतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडा करत असतो. परंतु, या सोडतीतील घरांचा उपयोग केवळ गरजूंना मिळावा यासाठी म्हाडाने अनेक नियम आणि अटी लागू केल्या आहेत. यापैकी महत्त्वाची अट म्हणजे म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे ते घर विकता येणार नाही. याचा उद्देश म्हणजे लाभार्थी घर विक्री करून फायदा घेण्याऐवजी स्वतः राहण्यासाठी ठेवेल.
मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता...?
तरीही म्हाडामधील सूत्रांच्या माहितीनुसार या अटीत बदल करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच म्हाडाच्या सोडतीतील घरांचा ताबा मिळाल्यानंतर विजेत्यांना किंवा गाळेधारकांना ते घर आवश्यकतेनुसार विकण्याची मुभा दिली जाऊ शकते. यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या प्रक्रियेत हालचाली सुरू आहेत. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर म्हाडाची घरे लगेच विकली जाऊ शकतील ,ज्यामुळे मूळ गरजूंना घरे देणे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
advertisement
म्हाडाच्या घर विक्रीचे काही नियम आधीही बदलले
म्हाडाने घर विकण्यावरील अटी पूर्वीही बदलल्या आहेत. सुरुवातीला घर मिळाल्यानंतर 10 वर्षे विकता येत नव्हते. बेकायदेशीररीत्या घरांची विक्री होण्याचे प्रकार समोर आल्यामुळे ही अट रद्द करण्यात आली. त्यानंतर 5 वर्षांची अट लागू करण्यात आली होती. सध्या ज्या घरांचा ताबा लाभार्थ्याला मिळतो. ते पुढील पाच वर्षे विकता येत नाहीत. मात्र, मोठ्या संख्येने घर विक्री प्रक्रियेत असल्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता पाच वर्षांची अट रद्द करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
म्हाडाच्या प्राधिकरणाची 301 वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पाच वर्ष किंवा दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच घर खरेदी करणाऱ्यांच्या नावावर घर हस्तांतरित करण्याविषयी प्रस्ताव मांडण्यात आला. बैठकीदरम्यान स्पष्ट झाले की सध्याची सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली असून अर्जदारांची सर्व माहिती म्हाडाकडे उपलब्ध आहे. एकदा लाभार्थी ठरल्यावर तो पुढे म्हाडाच्या किंवा सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. या सर्व परिस्थिती लक्षात घेता पाच वर्षे घर न विकण्याची अट रद्द करण्याबाबत चर्चा केली गेली.
advertisement
गृहनिर्माण विभागाच्या आदेशानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ या अटीत बदल करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाईल. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी या बैठकीत या प्रस्तावाविषयी चर्चा झाल्याचे मान्य केले.मात्र, अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव तयार करताना कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या मूळ उद्दिष्टाला धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रस्ताव मान्य झाल्यास घर घेणाऱ्यांना विक्रीची मुभा मिळेल तसेच घरांच्या योग्य वापराची संधी कायम राहील. असे बदल मूळ उद्दिष्ट गमावता न येता घर विक्री प्रक्रियेला सुलभ करतील आणि गरजूंना घरे उपलब्ध होण्याची गती वाढेल असे म्हाडातील सूत्रांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:13 AM IST