मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारा गॅस टँकर वेगात निघाला होता. दरम्यान, चालकाला अचानक भोवळ येऊन तो बेशुद्ध पडला. तरीदेखील त्याने शेवटच्या क्षणी गाडी पुलाच्या कडेला थांबवली. त्यामुळे महामार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. दीपक कुमार सिंग (32 वर्षे) असे टँकर चालकाचे नाव आहे. तो झारखंडचा राहाणारा असून लिक्विड पेट्रोलियम गॅसने भरलेला हा मोठा कॅप्सूल टँकर घेऊन निघाला होता. जर टँकरचा अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र अचानक प्रकृती खालवली तरी देखील टँकर चालक दीपक कुमार सिंग यांनी प्रसंगावधानाने गाडी थांबवली आणि बेशुद्ध पडला.
advertisement
वाहतूक सुरळीत
घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ गाडीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी चालकाला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने टँकर महामार्गावरील दुसऱ्या वाहनांना धडकला नाही किंवा उलटला नाही, अन्यथा मोठ्या प्रमाणावर जीवितहानीची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर सुरक्षित स्थळी हलवण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान, चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी कळवले.
महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रसंगावधानाने टँकर थांबविल्याने आणि स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भरणे नाका पूल महामार्गावरचा ब्लॅक स्पॉट असून त्या ठिकाणी नेहमीच अपघात होतात. अवघड वळण आणि तीव्र उतार असलेला हा भाग असून त्याच ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने दुर्घटना टाळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.