महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सुप्रिया सुळेंवर खळबळजनक आरोप केला आहे. बिटकॉईन प्रकरणावरून एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ही ऑडिओ क्लिप सुप्रिया सुळे यांची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी काही ऑडिओ क्लिपही सार्वजनिक केल्या आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसून याची चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
advertisement
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
‘तुम्ही सर्व बिटकॉईन काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा.’
‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत’ ‘गौरव तू आम्हाला उत्तर का देत नाहीयेस? आम्हाला पहिले पैसे हवे आहेत’, असं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 पुष्टी करत नाही.
