स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असणारे भरत गोगावले हे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.
आज मुंबईत सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. मंत्री म्हणून भरत गोगावले यांची उपस्थितीा अपेक्षित असताना ते मुंबईबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
भरतशेठ घेणार एकनाथ शिंदेंची भेट...
सूत्रांच्या माहितीनुसार, भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेणार आहेत. पार्श्वभूमी अशी की, काही दिवसांपूर्वी गोगावले यांनी यंदा रायगड जिल्ह्यातील 15 ऑगस्ट झेंडावंदन कार्यक्रम मीच करणार असा दावा केला होता. मात्र, कालच राज्य सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत रायगड जिल्ह्यातील झेंडावंदनाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना दिला गेला.
या घडामोडीनंतर गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत. ते झेंडावंदन मान न मिळाल्यामुळेच मंत्रिमंडळ बैठकीस अनुपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
शिंदे गट विरोधकांच्या रडारवर...
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदार हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासह आमदार संजय गायकवाड आदी चर्चेत आले होते. शिंदे गटाच्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी ठाकरे गटाने लावून धरली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचीदेखील सरकारमध्ये कोंडी करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गोगावलेंना पुन्हा ठेंगा, रायडमध्ये आदिती तटकरेच ध्वजारोहण करणार
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे.