आगामी मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची मोठी कसोटी लागणार आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर मुंबईचा बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हान ठाकरे यांच्यासमोर आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. एका बाजूला ठाकरेंचे शिलेदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा प्लॅन अॅक्टिव्ह मोडवर टाकत उद्धव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
advertisement
भूमिपुत्रांसाठी आणि मराठी माणसांना शासकीय आस्थापनांमध्ये नोकरीची संधी देण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिय लोकाधिकार समिती स्थापन केली होती. शिवसेनेच्या वाटचालीत स्थानिय लोकाधिकार समितीचा मोठा वाटा राहिला. आता, त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने
स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाची स्थापना केली. राज्यात महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी स्थानिक लोकाधिकार सेनेची स्थापना केली आहे.
ठाकरेंसाठी महत्त्वाच्या संघटनेपैकी एक संघटना...
भूमिपुत्रांच्या हक्कासाठी 1974 मध्ये स्थापन झालेल्या स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे काम केले. भूमिपुत्र आणि मराठी कर्मचाऱ्यांच्या अडचणींची सोडवणूक करून राडे करणारी संघटना अशी ओळख असणाऱ्या शिवसेनेत मध्यमवर्गीय शिवसैनिक जो़डला गेला. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी संघटना म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीची ओळख राहिली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थानिय लोकाधिकार समितीमधील नेतृत्वात असणारे गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेले. मात्र, इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे ठाकरेंसोबत राहिले. ठाकरेंच्या स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद हे खासदार अनिल देसाई यांच्याकडे आहे. तर, कार्याध्यक्ष म्हणून सुनिल शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे.
शिंदेंचा प्लॅन अॅक्टिव मोडवर...
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ स्थापन करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फायदा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला करून देण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीआधीच स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ स्थापन करून शिंदेंनी मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समितीला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून शिंदे गटाकडून ठाकरेंचा मराठी मध्यमवर्गीय मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची चर्चा रंगली आहे.