राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे काल रात्री उशिरा नवी दिल्लीत दाखल झाले असून, आज ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे हे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
शिंदेंची मोदी-शाहांसोबत भेट, विषय काय?
आठवडाभरात एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा समोर आली होती. आज एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सरकारच्या मुद्यांवरून ही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, शिवसेना निवडणूक चिन्ह, पक्ष याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीत आपल्या काही नेत्यांसोबत बैठकही घेणार आहेत.
उद्धव ठाकरेदेखील दिल्लीत....
दुसऱ्या बाजूला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून, इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या संयुक्त बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातील खासदारांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन संसद अधिवेशन, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांसंदर्भातील रणनीतीवर चर्चा करणार आहेत.
दिल्लीत हालचाली, राज्यात धक्के?
दोन्ही गटांचे दिल्लीतील दौरे जवळपास एकाच वेळी घडत असल्याने, राज्यातील राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल होण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत. शिंदे गट केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपसोबत आपले संबंध बळकट करत असताना, ठाकरे गट विरोधकांच्या INDIA आघाडीत आपली भूमिका अधिक ठाम करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.