स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असणारे भरत गोगावले हे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
गोगावलेंच्या पदरी पुन्हा निराशा...
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
नाराज नसल्याचा दावा...
दरम्यान, राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले. आपला दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हजर राहणे शक्य नव्हते. एखाद्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने पालकमंत्री ठरत नसतो, असेही गोगावले यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे का राहणार अनुपस्थित?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे श्रीनगर मध्ये आहेत. शिवसेना शिंदे गटाने सोमवारी जम्मूमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यानिमित्ताने शिंदे हे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. मात्र, आज ते श्रीनगरला राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नाराजी की वाढीव मुक्काम?
एकनाथ शिंदे हे सातत्याने दौरे करत असतात. आधल्या दिवशी दौरे, सभा बैठका करून दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी त्यांनी बैठका, शासकीय कामकाजात सहभाग घेतला आहे. आज मात्र थेट कॅबिनेट बैठकीला त्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांचा काश्मीरमधील मुक्काम हा वाढीव आहे की जाहीर नाराजी आहे, याची चर्चा रंगली आहे.