सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाविषयी सुनावणी होणार होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्या वकिलांशी समन्वय साधण्यासाठीच शिंदे दिल्लीला गेले होते, अशी चर्चा आहे. मात्र हा दौरा केवळ कायदेशीर मुद्द्यापुरता मर्यादित राहिला नसून त्यात राजकीय घडामोडींचाही समावेश झाल्याचे सूत्रांकडून समजते.
पक्षबांधणीसाठी दिल्लीतील भेटीगाठी
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची काही दिवसांपूर्वीच झालेली बैठक आणि पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या हालचाली हे शिंदे यांच्या दौऱ्यामागील आणखी एक कारण ठरले आहे. पक्षवाढीसाठी दिल्लीतील विविध राज्यांतील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेनेला आता राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळावे यासाठीची नवी मांडणी कशी असावी, याबाबत रणनीती आखण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांची इतर राज्याच्या प्रमुखांनी भेट घेतली.
advertisement
भाजप नेत्यांशी बंद दाराआड चर्चा
या दौऱ्यात शिंदे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो समोर आला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत आगामी निवडणुकांचे राजकीय समीकरण, मराठी आणि हिंदी मतांची गणिते आणि आगामी युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीचा धोका?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक ही महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि कोकण परिसरात मराठी मतांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. या मतविभाजनाचा फटका भाजप-शिंदे युतीला किती जागांवर बसू शकतो, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शिंदे-राज युतीची शक्यता?
याच दौऱ्यात शिंदे गट आणि मनसेमध्ये संभाव्य युतीबाबत प्राथमिक चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधूंनी जर एकत्र येण्याचा निर्णय कायम ठेवला तर कोणती रणनीती कामी येईल, कोणता मोठा मराठी नेता आपल्या बाजूने वळवल्यास मराठी मतांची फाटाफूट होईल, याबाबतही दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
हिंदी मतांचे समीकरण महत्त्वाचे
मुंबई, ठाणेमध्ये हिंदी भाषिक मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांची एकजूट होण्याची शक्यता असताना, भाजप-शिंदे गटाला हिंदी मतांची अधिक साथ लागेल का, याची समीकरणे जुळवली जात आहे. मुंबई आणि महानगर भागात मराठी मते एकवटल्यास त्याचा फटका महायुतीला बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता महायुती आपली रणनीती आखणार आहे.