पुण्यात गुंड आणि राजकीय नेत्यांचे कनेक्शन हा चर्चेचा विषय ठरला आहे. घायनळ गँगचा थेट संबंध चंद्रकांत पाटील यांच्याशी असून त्यांचाच घायवळ टोळीला आशीर्वाद आहे, असे वक्तव्य करून रविंद्र धंगेकर यांनी खळबळ उडवून दिली. धंगेकर यांनी पुण्याच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरल्याने त्यांच्या आरोपांची राज्यभर चर्चा झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो, असे सांगून धंगेकर यांची तक्रार करणार असल्याचेच एकप्रकारे सांगितले. पुण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांना यावर विचारले असता महायुतीत दंगा नको, असे धंगेकरांना सांगितल्याचे शिंदे म्हणाले.
advertisement
शांततेने घ्या, दंगा नको, एकनाथ शिंदे यांच्या रविंद्र धंगेकर यांना सूचना
रवींद्र धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. महायुतीत दंगा नको असे मी त्यांना सांगितले आहे. पण रवींद्र धंगेकर यांनी जे सांगितले की पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे तेच आमचे पण मत आहे, असे शिंदे म्हणाले.
पुण्यात लेकी बाळींना व्यवस्थित फिरता आले पाहिजे. गोरगरीब जनतेला आणि सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये. सर्वांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे. गुन्हेगारांना क्षमा नाही, कुणीही असू द्या, त्यांना पाठीशी घातले जाणार नाही. पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू. कुठल्याही गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही. गुन्हेगाराला क्षमा नाही, गुन्हेगारी मुक्त पुणे व्हावे हेच त्यांचे म्हणणे होते, असेही शिंदे म्हणाले.
पुणे पोलीस आयुक्तांवर बोलताना शिंदे म्हणाले...
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. गृह विभाग सक्षमपणे गुंडागर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करेल, कुणलाही सोडायचे नाही, अशा पोलिसांना सूचना असल्याचे शिंदे म्हणाले.