शिवसेना फोडल्यानंतर होणारी ही पहिली मुंबई महापालिका निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मुंबईतील ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेचे नेतृत्व मान्य केले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाकडून विभागप्रमुखांच्या नेमणुका करण्यात आल्या. मात्र यादी जाहीर होताच, "शिवसेनेत (ठाकरे गटात) असताना दिलेली वचने पाळली नाहीत आणि आता शिंदे गटातही संधी दिली जात नाही," अशा स्वरात काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
थेट शिंदेंची भेट, नाराजी व्यक्त...
पदाधिकारी नेमणुकीवरून सुरू असलेल्या या असंतोषाची झळ मंगळवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. नाराज पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपले मन मोकळे केले. काहींनी थेट समाज माध्यमांवरूनही आपली नाराजी प्रकट केली. विलेपार्लेतील जितेंद्र जानावळे यांनी, "ठाकरे गटात विभागप्रमुख पद मिळाले नाही, आणि आता शिंदे गटातही आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात आहे," असा रोखठोक सूर लावला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर नाही. तरी पक्षबांधणी आणि पदवाटपावरून निर्माण झालेला हा असंतोष शिंदे गटासाठी आगामी काळात डोकेदुखी ठरू शकते. तर, दुसरीकडे ठाकरे गटातही पुन्हा पक्ष प्रवेश करण्यासाठीची चाचपणी काहींनी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडून पुन्हा ठाकरे गटात याआधी काहींनी प्रवेश केला आहे.
राहायला पुण्यात, जबाबदारी मुंबईतील...
शिंदे गटातील नेमणुकांवरून नाराजी व्यक्त होत असताना काहींच्या नियुक्तीवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मलबार हिल विधानसभा मतदारसंघात प्रवीण कोकाटे यांची प्रभारी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, कोकाटे गेली काही वर्षे पुण्यात राहत आहेत.पुण्यात वास्तव्य असणाऱ्याला एवढं मोठं पद कसं काय मिळाले, याचीही चर्चा सुरू झाली आहे. तर, काहींनी एक-दोन महिन्यापूर्वीच पक्षात प्रवेश केला. तरी त्यांना मोठी जबाबदारी कशी काय दिली, यावरून शिंदे गटात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.