सुमित सावंत, प्रतिनिधी मुंबई : विरोधकांकडून महायुती सरकारवर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात येतो. विरोधी बाकांवरील आमदारांच्या निधीत कात्री लावण्यात येत असताना दुसरीकडे सत्ताधारी बाकांवरील आमदार, माजी आमदारांना मोठा निधी दिला जात असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. आता या आरोपाला बळ देणारं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराने केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे दादर-माहीम माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरवणकर यांनी आपल्या भाषणात, “आमदार असल्यावर दोन कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसतानाही वीस कोटी रुपये मिळत आहेत,” असे वादग्रस्त वक्तव्य केले.
दादर-माहीम परिसरातील एका कार्यक्रमात भाषण करताना सरवणकर यांनी हे वक्तव्य केले. सदा सरवणकर म्हणाले की, “मी आमदार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आमदार नसतानाही माझी कामे सुरू आहेत. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी कामे केली. मात्र माझा अनुभव असा आहे की काम करणाऱ्यांचा पराभव होतो, आणि काम न करणारे जातीपातीवर निवडून येतात.”
ते पुढे म्हणाले, “मी कधीच पराभूत झालो असं वाटलं नाही, लोकांचं प्रेम माझ्यासोबत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यामागे खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे मी पराभूत नाही. माझा स्वभावच काम करण्याचा आहे, म्हणूनच तुम्ही मला सर्वत्र उद्घाटन करताना पाहता, असे त्यांनी म्हटले.
सरवणकर यांच्या “20 कोटींच्या निधी” या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. याआधी देखील आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून राज्यात वाद झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरवणकरांचे हे वक्तव्य ठाकरे गट आणि विरोधकांकडून टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे.