सांगली: मराठा आरक्षणासाठीच्या निर्णायक आंदोलनाचा टप्पा आता सुरू झाला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांचा जथ्था बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघाला. यामध्ये हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले. मुंबईत मराठ्यांच्या आंदोलनाचे वादळ 29 ऑगस्ट रोजी धडकणार आहे. या मोर्चासाठी सरकारने एक दिवसाची परवानगी दिली आहे. आता, शिंदे गटाच्या नेत्याने मौन सोडलं आहे.
advertisement
मुंबईतूनच आता मराठा आरक्षणाचा गुलाल उधळणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात समाजाने उतरण्याची हाक जरांगे यांनी दिली आहे. मुंबईच्या दिशेने मराठ्यांचे वादळ कूच करू लागलं आहे. आझाद मैदानावर सरकारने एक दिवसच आंदोलन करण्यास मराठा मोर्चास परवानगी दिली आहे. मात्र, एक दिवसाच्या परवानगी वरून मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त करत सरकार आमची चेष्टा करत असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्याने त्यावर भाष्य केले आहे.
राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, देश-विदेशातून लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात येतात. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
एक दिवसाची परवानगी पण...
तासगाव येथे बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा आहे. या काळात भाविकांना कुठलीही गैरसोय होता कामा नये. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलन करताना नियमांचे पालन करावे आणि एकदिवसीय आंदोलनावर भर द्यावा.” ते पुढे म्हणाले की, आंदोलन करणे हा लोकशाही हक्क आहे, मात्र त्याचवेळी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक उत्सवात अडथळा निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे देसाई यांनी म्हटले.