मुंबई पार पडलेल्या मराठी मेळाव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणांवर चर्चा झडू लागली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास निवडणुकीतील मतांच्या गणितात मोठा परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या बंधू मिलनानंतर ठाकरे ब्रँड पु्न्हा चर्चेत आला आहे.
एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी, लातूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर थेट प्रतिक्रिया दिली. "जर हे दोघं 15 वर्षांपूर्वी एकत्र आले असते, तर कदाचित काहीतरी राजकीय चित्र बदललं असतं. पण आता या भेटीचा फारसा परिणाम होणार नाही," असा स्पष्ट सूर गायकवाड यांनी व्यक्त केला.
advertisement
"उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार सोडून दिला. आणि राज ठाकरे यांनीसुद्धा टाळीला टाळी द्यायला फार उशीर केला आहे. त्यामुळे आता या एकत्र येण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होईल, असं वाटत नाही," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
ठाकरे नावातला ब्रँड कुठं राहिला?
प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या 'ठाकरे ब्रँड' संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, "आता ठाकरे नावातला ब्रँड राहिलेला नाही. सध्या राजकारणात तुमचं जनतेशी किती प्रत्यक्ष जोडलेपण आहे, किती काम करता, हे महत्त्वाचं आहे. जर ठाकरे नावच एक ब्रँड असतं, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 288 आमदार निवडून यायला हवे होते. पण तेव्हाही 70-74 च्याच आसपास होतो, असेही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले.