दिल्लीमध्ये शिंदे यांनी भाजपमधील बड्या नेत्यांशी गुप्त भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या कालावधीत हा दौरा झाल्यामुळे अनेकांची भुवया उंचावल्या आहेत.शिंदे यांच्या या अचानक दिल्लीतल्या हालचालींमुळे राजकीय भाकितं जोर धरू लागली आहेत. राज्यात पुन्हा काही मोठं राजकीय समीकरण तयार होणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
advertisement
दिल्लीत कोणाला भेटले?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह आणि अजित डोवाल यांची एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निधी वाटपाच्या मुद्यावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी आदी मुद्यांवरही अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र, शाह आणि डोवाल यांच्या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीचा अधिकृतपणे तपशील समोर आला नाही. एकनाथ शिंदे यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली नाही.
शिंदे आजही दिल्लीत?
दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्वीचे कर्नाक पूल आणि आता सिंदूर पूलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले.
शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर उदय सामंतांनी काय म्हटले?
आज माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे दिल्लीत होते हे मला तुमच्या कडून समजले असल्याचे सांगितले. उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचे वृत्त थेट फेटाळले नाही. मुंबई आणि राज्याच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. त्यातून ते दिल्लीला गेले असतील असेही सामंत यांनी म्हटले. सामंत यांच्या उत्तराने राज्यात नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.