उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवल्याचा आरोप केला होता. या आरोपाच्या अवघ्या तीन दिवसांनंतरच हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ही ठाकरे गटासाठीमोठी अडचण मानली जात आहे.
खरं तर, मागील काही दिवसांपासून चाळीसगावमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील विरुद्ध चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही बाजुने एकमेकांवर आरोपींच्या फैरी झाडल्या जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उन्मेष पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे.
