या पतपेढीमध्ये 2006 पूर्वी शिवसेनेची सत्ता होती. दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने 2006 मध्ये सोसायटीमध्ये सत्ता मिळवली. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने सत्ता खेचून आणली. बेस्ट पतपेढीच्या सत्ता संघर्षात शिवसेना आणि शरद रावांच्या युनियनमध्ये थेट लढत राहिली आहे. राजकीय पटलावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेने मनसेच्या कामगार संघटनेसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू झाली. बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडच्या मुद्याला अधिकच हवा देण्यात आली होती. मात्र, प्रचारातील या मुद्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे समोर आले.
advertisement
या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलचे 14 उमेदवार निवडून आले. तर आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वातील भाजप-शिंदे गटाच्या पॅनलचे सात जण विजयी झाले. ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.
>> बेस्ट कामगारांचा रोष ठाकरेंना भोवला, पराभवाचं कारण काय?
> बेस्ट कामगारांमध्ये बेस्ट कामगार सेनेवर चांगलाच रोष होता. बेस्ट पतपेढीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांसह इतर मुद्यांवर कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. हा रोष या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर पडला असल्याचे दिसून आले.
> बेस्टमध्ये 2019 मध्ये कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातून ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेने माघार घेतली. या माघारीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संप फोडला जात असल्याची तीव्र भावना तयार झाली.
> बेस्ट कामगार सेनेत मागील काही वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या हाती कारभार असल्याची टीका सातत्याने सुरू होती. संघटनेत असलेला एककल्ली कारभार, उपक्रमातील संघटनेतील नेतृत्वात न झालेल्या बदलामुळे संघटना कामगारांपासून काहीशी दुरावल्याची चर्चा निवडणुकीआधीच सुरू होती.
> मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता असूनही बेस्टसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिले. शिवसेनेने बेस्टसाठी काहीच केलं नाही, ही भावना कामगारांमध्ये प्रबळ झाली. बेस्ट कामगारांच्या संपावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्यास होकार दर्शवला होता. त्याशिवाय, बेस्टच्या ताफ्यातील जवळपास 3700 बसेस या उपक्रमाच्या मालकीच्या असणार होत्या. मात्र, या दोन्ही आश्वासनांवर शिवसेनेकडे सत्ता असूनही अंमलबजावणी झाली नाही. बेस्ट उपक्रमावर ओढवलेली हलाखीची स्थिती, निवृत्त कर्मचाऱ्यांची रखडलेली देणी आदींमुळे नाराजीचा स्फोट निकालातून दिसून आला.
> उमेदवारीच्या घोळाचा फटकाही ठाकरे गटाला बसला. निवडणुकीच्या वेळी 21 जागांसाठी अनेकांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, अंतिम 21 जागांवरील उमेदवार अंतिम करण्यात आल्यानंतर उर्वरित जणांना अर्ज माघारी घ्यावी लागली. त्यातील काही जण नाराज होते. त्यांनी उघडपणे, छुप्या पद्धतीने बंडखोरी केली, त्याचा फटका ठाकरेंच्या उमेदवारांना बसला.
> प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, किरण पावस्कर, नितेश राणे या भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी एकत्रित येत आपलं पॅनेल उभं केलं. आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत त्यांनी बेस्ट कामगार सेनेला जेरीस आणले. तर, दुसरीकडे शशांक राव यांनी बेस्टमधील कामगारांच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले होते.
> शशांक राव यांनी भाजपात प्रवेश करण्याआधी बेस्ट कर्मचार्यांसाठी आंदोलन केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत डाव्या कामगार संघटनादेखील होत्या. बेस्ट कामगारांसाठी केलेल्या आंदोलनाचा फायदा शशांक राव यांना झाला. राव यांची युनियन ही बेस्टमधील महत्त्वाची युनियन आहे. राव यांनी रणनीती आखत आपले उमेदवार विजयी केले.