राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) पुण्यात मोठी कारवाई करत रेडनेक्स फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड या औषध कंपनीकडून उत्पादित ‘रेसपिफ्रेश टीआर’ या खोकल्यावरील औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे. या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) हे विषारी औद्योगिक रसायन धोकादायक प्रमाणात असण्याची शक्यता वर्तवली गेल्याने ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून प्राप्त सूचनांनुसार ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. अलीकडेच मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ‘कोर्ड्रफ’ आणि ‘नेस्ट्रो डी एस’ या खोकल्याच्या सिरपचे सेवन केल्याने तब्बल १९ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली होती.
advertisement
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही औषध विभाग सतर्क झाला असून, राज्यातील सर्व खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची सखोल तपासणी सुरू आहे. तसेच मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांतील औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हुकरे यांनी स्पष्ट केले की, ज्या औषधामुळे इतर राज्यांमध्ये मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्या औषधांचा साठा महाराष्ट्रात नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सिरप नमुन्यांची चाचणी केली जात आहे.
दरम्यान, दोन वर्षांखालील बालकांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप देऊ नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिल्याची माहितीही हुकरे यांनी दिली आहे. FDAच्या या कारवाईमुळे औषध सुरक्षिततेबाबत राज्यभरात पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.