नाशिक: देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच नाशिकरोड भागातील फर्नांडिस वाडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटाकडून तब्बल 15 ते 20 राउंड फायर करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड भागातील फर्नांडिस वाडीमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन गट आपसात भिडले. यावेळी दोन्ही गटाने जोरदार हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रकार केला. एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी दगडफेक आणि काचेच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या होत्या.
गोळीबार करणारे कोण, नेमकं काय घडलं?
फर्नांडिस वाडीमध्ये बेद आणि जॉनवाल गँग समोर समोर येऊन एकमेकांच्या दिशेनं फायरिंग केली. जवळपास पंधरा ते वीस राउंड दोन्ही गटाकडून फायर करण्यात आले होते, असं येथील स्थानिक नागरिकांनी सांगितलं. तसंच त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवार भडकल्याने टोळी युद्ध थांबण्याचा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर उभा राहिलं आहे.