एकीकडे पूजा अटकेत असताना गोविंद बर्गेनं आत्महत्या पूर्वी नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे हा मागील काही दिवसांपासून तणावात होता. कला केंद्रातील नर्तकी पूजा त्याला पैसा, जमीन आणि घरासाठी दबाव आणत होती. गोविंदने आपल्या मित्राला याबद्दल सांगितले. कला केंद्रात गोविंद आणि नर्तकी पूजा गायकवाड यांची ओळख झाली. पूजा आणि गोविंद यांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर गोविंदने प्लॉट, शेतजमीन, आयफोन, महागडे दागिने, बुलेट असे सर्वकाही महागड्या गोष्टी पूजाला दिल्या. मात्र, पूजाच्या अपेक्षा वाढत होत्या.
advertisement
गोविंदने गेवराईत आलिशान बंगला बांधला. त्या बंगल्यात गोविंद याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील राहत होते. मात्र, गोविंदच्या या बंगल्यात पूजा दोन दिवस मुक्कामी गेली. तेव्हा तिला हा बंगला इतका जास्त आवडला की, तिने हा बंगला आपल्या नावावर करावा, यासाठी गोविंदकडे तगादा लावला. तुझ्यासाठी दुसरा असाच बंगला बांधून देतो, असे गोविंदने सांगितलं. पण पूजा ऐकण्यास तयार नव्हती. बंगला नावावर केला नाही, तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी नर्तकीने दिली. तसेच तिने गोविंदसोबतचा संपर्क तोडला. पूजा बोलत नसल्याने गोविंद अधिक तणावात आला.
मैत्रिणीला संपर्क केला पण...
घटनेच्या दिवशी गोविंदने पूजाला बोलण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. पूजा काम करत असलेल्या कला केंद्रात तो पोहोचला. मात्र, तिथे तिची भेट होऊ शकली नाही. तिच्या मैत्रिणीला संपर्क करून त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला पूजाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पूजाने आपल्याला बोलावे याकरिता तो प्रत्येक प्रयत्न करत होता. शेवटी गोविंद बर्गे हा थेट पूजाच्या घरी तिच्या आईला भेटण्यासाठी गेला.
पूजा भेटली नाही अन् तिच्या आईलाही दया नाही आली
"पूजाला काहीतरी समजावा, ती माझ्याशी बोलत नाही, असे त्याने पूजाच्या आईला सांगितले. मात्र, पूजाच्या आईलाही गोविंदची दया आली नाही. विनवणी करूनही पूजाच्या आईकडून त्याला काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गोविंदला माहिती होते की, पूजा ही कला केंद्रात आहे… तिला समजून सांगूनही ती ऐकत नाही. किमान तिच्या आईला बोलल्यावर काहीतरी मार्ग निघेल, असं गोविंदला वाटलं. मात्र, पूजाच्या आईकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तणावात असलेल्या गोविंदने पूजाच्या घराबाहेरच कारमध्ये स्वत:वर गोळी झाडली.