छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात एकीकडे अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एमआयडीसी वाळूज परिसरात एका टोळक्याने तरुणावर हल्ला केला. या टोळक्याने तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न केला पण पिस्तुलीमधलं मॅगझिन खाली पडलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज भागातील बजाजनगर परिसरातील प्रताप चौक इथं बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. तिघा-चौघांनी मिळून एका युवकावर चाकूने वार केलं. यावेळी आरोपींनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला असता पिस्तुलातील मॅगझिन खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात भोळाराम शामराव कडमींचे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी चाकूने हल्ला करताना पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र मॅगझिन खाली पडल्याने गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, या टोळक्याने हा हल्ला का आणि कशासाठी केला, हे अद्याप समोर आलं नाही. या घटनेमुळे बजाजनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी धावपळ उडाली. वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.