अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत एक टर्फ लाइन गेल्यानं पावसाचा धोका कायम आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 8 ते 10 जिल्ह्यांसाठी अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. घराबाहेर पडण्याआधी तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं असेल जाणून घेऊया.
advertisement
कोणत्या 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांसाठी आज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या आणि परवा पुन्हा एकदा विदर्भात पाऊस जोर धरेल. 50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पाऊस विश्रांती घेईल असा प्राथमिक अंदाज आहे.
रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बाप्पाचं आगमनही मुसळधार पावसातच करावं लागतंय की काय अशी परिस्थिती तळ कोकणात आहे. अति मुसळधार झालेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धरणं भरुन वाहात आहेत. सध्या उजनी धरण 105 टक्क्याहून अधिक भरलंय. उजनी धरणांमधून 16 दरवाज्यातून 1 लाख 50 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरु केला होता. त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलं आहे.
पुराची कुठे काय परिस्थिती?
गडचिरोली जिल्ह्यात तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोमनपल्लीलगतच्या नाल्यावर इंद्रावती नदीच्या पुराचे पाणी आले. त्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करूनही हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. नालासोपाऱ्या झालेल्या पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरलेलं असतानाही अशाच परिस्थितीत पोलिसांना काम करावं लागतं. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे आता या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.