मुंबई : पुढील 2 दिवस राज्यांत पावसाचा जोर हा काहीसा कमी असणार आहे. मागील 2 दिवस राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी शहरांमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं.
आता पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. जाणून घेऊयात, उद्या 11 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
advertisement
मुंबईत मागील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील बहुतांश भागांमध्ये मधून मधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 32°c तर किमान तापमान 27 °c इतके राहण्याची शक्यता आहे.
पांडुरंगाच्या वारीतही योगा, यातून भक्तीचा मार्ग सुखकर…, वारकऱ्यांनी व्यक्त केल्या ‘या’ भावना
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे. यानंतर मात्र पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.