ऋषिराज सावंत यांच्या बायकोचा मंगळवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी ऋषिराजचे बँकॉकला जाण्याचे नियोजन होते. यावरून घरात वाद सुरू होता. घरातील मंडळी बँकॉकला जाऊ नकोस, असे ऋषिराजला सांगत होते.
तुम्ही बँकॉकला जाऊ नका, पत्नी विनवणी पण...
परंतु ऋषिराज ऐकायला तयार नव्हता. दोन मित्रांसमवेत ऋषिराजचा बँकाक टूरचा प्लॅन ठरला होता. घरच्यांचा विरोधाला न जुमानता, कुटुंबातील कुणालाच न सांगता ऋषिराज ठरल्याप्रमाणे दोन मित्रांसमवेत दुपारी साडे चार वाजता पुण्यावरून बँकॉकला उड्डाण केले.
advertisement
ऋषिराज आपल्याला चकवा देऊन घरातून निघून गेला, हे कळताच तानाजी सावंत यांच्या संतापाचा पारा चढला. त्यात ऋषिराज सावंत यांच्या पत्नीचाही संताप वाढत होता, असे सूत्रांनी सांगितले. तानाजी सावंत यांनी संस्थेतील एका व्यक्तीला सांगून सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करून घेतली आणि सुरू झाली फोनाफोनी...
शिंदे-फडणवीसांना फोन, सुरुवातीला प्रतिसाद नाही पण जगताप मध्यस्थी झाले अन्....
त्यांनी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला परंतु आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केला. मुख्यमंत्री देखील कामात असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी मग नातेवाईक असलेले भाजप आमदार शंकर जगताप यांना सांगून फडणवीस यांना संपर्क साधला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे पोलिसांना आवश्यक सूचना दिल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवली.
तातडीनं माघारी फिरा, पायलटला सूचना
तोवर तानाजी सावंत यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन फिरवला होता. मोहोळ यांनीही हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क केला. मग एटीसीने ऋषिराज प्रवास करत असलेल्या विमानाच्या पायलटशी संपर्क साधला. साडेचार वाजता उड्डाण केलेलं विमान त्यावेळी बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होते. तातडीनं माघारी फिरा, अशी सूचना एटीसीकडून पायलटला देण्यात आली.
पुन्हा फिरून आपण पुण्यातच आलो हे ऋषिराजला कळाले तेव्हा.....
जशीही सूचना मिळाली तसे विमानाने युटर्न घेतला मात्र याची ऋषिराजला जराही कुणकूण लागू दिली नाही. चार तासांचा प्रवास करून विमान पुन्हा पुण्यात आले. चार तासांचा प्रवास झाल्याने आपण बँकॉकला आल्याचे ऋषिराजला वाटले. पण जिथून बसलो तिथेच उतरलो, हे जेव्हा ऋतुराजला दिसले तेव्हा त्याचा भ्रमनिरास झाला होता. पण यानिमित्ताने त्याला बापाची वॉवर आणि यंत्रणांमध्ये असलेला दबदबा कळाला.