सिंदफळ येथे काही महिन्यांपूर्वी सत्तार यासिन इनामदार यांची हत्या झाली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांच्याकडे होता. कायद्यानुसार, अटकेच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, तपास अधिकारी म्हणून नरवडे यांनी वेळेत दोषारोपपत्र सादर केले नाही.
न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले
advertisement
याच तांत्रिक चुकीचा फायदा घेत आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेवर दाखल न झाल्याच्या कारणावरून न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. या घडामोडीनंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. तपास अधिकाऱ्याच्या या चुकीमुळे आरोपींना एक प्रकारे मदतच झाल्याचे दिसून येत आहे.
कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ
सिंदफळ येथील सत्तार यासीन इनामदार यांच्या हत्येप्रकरणी तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, आरोपींना मदत करण्याच्या हेतूने नरवडे यांनी तपासात हेतुपुरस्सर दिरंगाई करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात वसीम गफूर इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.